तळेगांव (शा.पंत) : अवघ्या चार तासात चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात तळेगाव पोलिसांना यश आले आहे. ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. तळेगांव पोलिस ठाण्याच्या हद्दीत चपलांचा कारखाना आहे. याठिकाणी तळेगाव व परिसरातील असंख्य कामगार काम करत असतात. चपलांचा कारखाना असल्याने याचे रॉ मटेरियल खूप जास्त प्रमाणात असते. हे मटेरियल काही युवक चोरून नेत असल्याचा संशय तेथील कर्मचाऱ्यांना आला. त्यावर लक्ष केंद्रीत केले असता तीन युवक हे कारखाना परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याचे त्यांना दिसले. यावरून त्यांनी तातडीने तळेगांव पोलिसांत तक्रार केली.
कर्तव्यावर असलेले पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा यांनी तातडीने आपली तपास चक्रे फिरविली. त्यांना मिळालेल्या विश्वसनीय सूत्रानुसार तक्रारदारांनी वर्णन केलेले आरोपी हे तळेगावच्या रामदरा परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. यावरून जमादार संदीप महाकाळकर, रमेश परवत, देवेंद्र गुजर, यांना सोबत घेऊन आरोपींच्या शोधात निघाले, असता तळेगांवच्या अमरावती रोडवरील जयस्तंभजवळ एक कुटुंब अतिक्रमण करून राहत असल्याचे माहित पडले.
उपनिरीक्षक हुसेन शहा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सदर ठिकाणी जाऊन तपासणी केली असता संबंधित तीनही आरोपी घरी मिळून आले. पंचासमक्ष त्यांच्या घराची झडती घेतली असता चोरलेला मुद्देमाल घराच्या मागच्या बाजूस मिळून आला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. सदर कारवाई ठाणेदार आशीष गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा, पोलिस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, जमादार संदीप महाकाळकर, रमेश परबत, देवेंद्र गुजर यांनी केली.