अल्लीपूर : वर्धा जिल्ह्यालगतच्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील वाळू चोरट्यांनी वर्धा नदीपात्रात चांगलाच धुडगूस घातला आहे. रात्रीच्या सुमारास नदीपात्र पोखरून टाकत असल्याने अल्लीपूर पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याकडून ७ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. विनायक आनंद महाजन, नितीन मदन हिकरे व अंकुश गोपाळसिंग ठाकूर सर्व राहणार राळेगाव, असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
कापसी येथील वर्धा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याची माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळाली. त्यामुळे ठाणेदार सुनील गाडे कर्मचाऱ्यांसोबत गस्त घालत असताना हे तिघेही वाळू चोरी करीत असताना निदर्शनास आले. पोलीस आल्याची माहिती मिळताच ट्रॉलीतील वाळू खाली करुन तिघांनीही पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना त्यांच्याकडून तीन मोबाईल, एक ट्रॅक्टर आणि एम.एच-४०-४१११ क्रमांकाची कार असा एकूण ७ लाख २१ हजाररुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुनील गाडे, संजय रिठे, शंकर पोहाणे, संजय वानखेडे, कमलेश डेंगळे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल भोजगुडे करीत आहे.