
कारंजा : तालुक्यातीळ येनगाव येथील संजय तुळशीराम चोपडे (36) या युवा शेतकऱ्याने स्वतःच्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून 16 नोव्हेंबर रोजी दुपारच्या वेळेस आत्महत्या केली.
संध्याकाळी रोजमजुरीच्या कामावरून मृतकांची आई घरी आल्यानंतर ही बाब लक्षात आली. आत्महत्याग्रस्त शेतकरी हा विवाहित असून त्यांची पत्नी नागपूर येथे राहते. तर मृतक हा मागील वर्षी कोरोना काळापासून नागपूर येथील नोकरी गेल्याने येनगाव येथेच राहून स्वतःची शेती करीत होता. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वीच कारंजा येथील बँकेमधून क्रॉप लोनचे मंजूर झालेले पैसे उचलले होते.
त्याच्यावर असलेले खाजगी कर्ज फेडले होते. परंतु, तरीही कर्जाची पूर्ण फेड न झाल्याने व सततच्या नापिकीने वैतागून मृतक संजयने आत्महत्या केली, असे गावकऱ्यांनी सांगितले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पश्चात आई, पत्नी व पाच वर्षांचा मुलगा असा आप्त परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कारंजा पोलिस करीत आहेत.