वर्धा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस सात वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दीपक पांडुरंग राऊत रा. पाचगाव (पुनर्वसन) ता. देवळी, असे शिक्षेस पात्र ठरलेल्या व्यक्तीचे नाव असून, हा निकाल जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी दिला.
आरोपी दीपक राऊत याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४, तसेच भादंविच्या कलम ३७६ (१) नुसार सात वर्षांचा सश्रम कारावास व सात हजार रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त १ वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच, कलम ३५७ (अ) फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार नुकसानभरपाई दंडाच्या रकमेतून पाच हजार रुपये पीडितेला देण्याचे निर्देश न्यायाधीशांनी दिले आहेत.
पीडिता ही आजोबाच्या घराकडून स्वत:च्या घरी जात असताना आरोपी दीपक याने तिला वाटेत अडवून जबरी जि.प. प्राथमिक शाळेत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने आरडा-ओरड केली असता काही नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान संधी मिळताच आरोपीने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. या प्रकरणी देवळी पोलिसांत तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गजानन दराडे यांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी आरोपीला सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली.