चेन्नई : दिवाळीच्या दिवशी फटाके फोडायचे या आनंदात सात वर्षीय चिमुकला आपल्या वडिलांसोबत फटाक्यांची पिशवी घेऊन घरी जात होता. मात्र, पिशवीतील देशी फटाक्यांचा स्फोट झाला. त्यामुळे गाडीने देखील पेट घेतला. यामध्येच चिमुकला आणि त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून दिवाळीच्या दिवशीच पती आणि मुलगा गमावल्याने आईने हंबरडा फोडला.
आर्यनकुप्पम येथील कालाईनेसन (३७) असे मृताचे नाव असून, तो सात वर्षांच्या मुलासह विल्लुपुरमजवळील कुनीमेडू येथे आपल्या सासरवरून घराकडे जात होता. दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या दुकानातून फटाक्यांची खरेदी केली. मुलाच्या हातात बॅग दिली आणि दोघेही सासरी जायला निघाले. गाडी कोट्टाकुप्पमजवळ पोहोचताच फटाक्यांचा स्फोट झाला. दोघेही मोटारसायकलवरून १०-१५ मीटर अंतरावर फेकले गेले. त्यामुळे कालेनेसनच्या वाहनाजवळील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पाँडचेरीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.