मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुलीचे आरोप आहेत. त्यासाठी त्यांनी काल ईडी कार्यालयात हजेरी लावली. मात्र, १४ तासांच्या चौकशीनंतर देशमुखांना अटक करण्यात आली. आज त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी देशमुखांना १४ दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीने केली होती. त्यानंतर न्यायालयाने देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी दिली आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या घरावर ईडी, सीबीआय, आयकरविभागाने छापेमारी केली होती. त्यामुळेच देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या अनेक दिवसांपासून देशमुखांना ईडीने समन्स बजावले होते. तब्बल पाच समन्स बजावून देखील अनिल देशमुख चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस देखील जारी करण्यात आली होती.
न्यायालयाने ईडीच्या कारवाईपासून कुठलाही दिलासा नाही, असं म्हटल्यानंतर शेवटी अनिल देशमुख सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ”न्यायालयात माझ्या याचिका प्रलंबित होत्या. तसे लेखी उत्तर मी ईडीला दिले होते. मी चौकशीला पूर्णपणे सहकार्य केले आहे. आता न्यायलयातील याचिका निकाली निघल्यानंतर मी चौकशीसाठी हजर झालो आहे. मात्र, परमबीरसिंह कुठे आहेत? माझ्यावर आरोप करणारेच फरार आहेत”, असं अनिल देशमुख म्हणाले होते.
सोमवारी त्यांची तब्बल १४ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या नागपुरातील साई शिक्षण संस्थेमध्ये ईडीला काहीतरी पुरावे सापडल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. देशमुखांनी ईडी कोठडी देण्यात आली आहे.