

नारायणपूर : नंदोरी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या नारायणपूर फिडरची वीजवाहिनी नेहमी नादुरुस्त राहत असल्याने परिसरातील गणेशपूर, बल्लारपूर, गोविंदपूर आदी गावांतील वीजपुरवठा खंडित होत असल्याने मागील दोन दिवसांपासून बल्लारपूर, गणेशपूर शिवारातील थी्-फेज वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ओलिताची कामे खोळंबली आहे. याकडे मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी त्रस्त आहे.
वीजपुरवठ्या अभावी शेतकऱ्यांच्या शेतातील ओलिताची कामे ठप्प झाली असल्याने भाजीपाला पिके सुकण्याच्या मार्गावर आहे. याबाबत वीजतंत्रज्ञास सांगितले असता हे माझे काम नाही, असे सांगून काढता पाय घेत वरिष्ठांना तक्रार करा, असा सल्ला दिला. महावितरणच्या अभियंत्यास संपर्क करून विचारणा केली असता सुटी असल्याने सोमवारी वीजपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले.
नारायणपूर येथील चार घरांत विजेचा करंट आल्याने एक महिला विजेचा झटका लागल्याने जखमी झाली. त्यामुळे महावितरण कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याकडे अधीक्षक अभियंत्याने लक्ष देत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.