वर्धा : शेतक-यांच्या शेतातील मोटारपंप चोरी करणा-या दोन आरोपींना देवळी येथून अटक करण्यात आली. ही कारवाई देवळी शहर डीबी पथकाच्या वतीने करण्यात आली. देवळी शिवारातील उमेश विजयराव कारोटकर यांच्या शेतातील विहीरीतून तिन हॉर्सपांवरची पाण्यातील मोटार किंमत ७ हजार रुपये कोणीतरी अज्ञाताने चोरून नेल्याबाबत देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
ठाणेदार तिरुपती अशोक राणे यांनी लक्ष घालून डीबी पथकातील कर्मचारी कुणाल हिवसे, अनिल तिवारी, उमेश गेडाम, दयाल धवने यांनी चोरट्यांची माहिती गोळा केली. शोध घेत असताना देवळी परिसरातील आरोपी शंकर उर्फ मास नारायण नांदणे (वय ३४), सागर पांडुरंग मरघाडे (वय ३०) दोन्ही रा. इंदिरा नगर देवळी यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला.
देवळी पोलिस ठाण्यात फिर्यादी अनिल गणपतराव क्षीरसागर यांच्या शेतातील विहिरीतील मोटार (किंमत ७ हजार) चोरून नेल्याची कबुली दिली. आरोपीकडून गुन्ह्यातील मोटारपंप किंमत १४ हजार रुपये हस्तगत करण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळसिंग पाटील यांच्या सूचनेप्रमाणे ठाणेदार तिरुपती राणे व त्यांच्या तपास पथकातील डीबी कर्मचारी कुणाल हिवसे, अनिल तिवारी, उमेश गेडाम, दयाल धवने आदींनी केली.