वर्धा : घरी कोणीही नसल्याची संधी साधत कुलुपबंद घरांचे कडीकोंडा व कुलुप तोडून चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडत २ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना महादेवपुरा व लहानुजी नगर भागात मंगळवारी रात्रीदरम्यान घडली.
चोरट्यांनी फिर्यादी शेख बशीर शेख रज्जाक (वय ४०) लहानुजी नगर यांच्या हे पत्नीची प्रसुती असल्यामुळे बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घरातील कपाटात ठेवून असलेले १ लाख २० हजार रुपये रोख, त्यांच्या शेजारी असलेल्या नसीम अख्तर शेख यांच्या घरातील कपाटातून रोख ५० हजार रुपये तसेच नीलेश कैलास सुरवाडे यांच्या घरातील दुचाकी किंमत ६० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
या प्रकरणी शेख बशीर शेख रज्जाक यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास वर्धा शहर पोलिस करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात बाढ झाली आहे. आता दिवाळी सण असल्यामुळे अनेकजण घराला कुलुप लावून बाहेरगावी जातात. या संधीचा चोरटे फायदा घेत आहेत.