नागपूर : अनेक दिवसांपासून गंगाजमुना परिसरातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आणि पोलिसांमध्ये वाद सुरू आहे. त्यातूनच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कलम ७(१) नुसार गंगाजमुना परिसरात सुरू असलेला वेश्याव्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश काढले आहे.
अनेक दिवसांपासून गंगाजमुना वस्ती हटविण्याबाबत वाद सुरू आहे. त्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. पोलिस विभागामार्फत येथे राहणाऱ्या सामान्य नागरिकांकडून त्याबाबत सूचना आणि आक्षेप मागविण्यात आले होते. याशिवाय पोलिस आयुक्तांनी स्वतः परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. त्या माध्यमातून मिळालेल्या सूचना आणि आक्षेपावरून पोलिस आयुक्तांनी अधिकाराचा वापर करीत या ठिकाणाला सार्वजनिक ठिकाण घोषित करून येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर बंदी घातली.