दुचाकी अपघातात सख्खे भाऊ जागीच ठार! चुलत भाऊ गंभीर जखमी

पुसद : तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सावरगाव (गोरे) , येथे युवकांच्या दुचाकीने झाडाला धडक दिली. यात दोन सख्खे भाऊ जागीच ठार, तर चुलत भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

भगवान यादव भालेराव (3०) आणि गजानन यादव भालेराव (२२), दोघेही रा. जवळा, अशी ठार झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. त्यांचा चुलतभाऊ आदित्य दादाराव भालेराव (१४) हा गंभीर जखमी झाला. त्याचा पाय मोडला. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. शुक्रवारी मध्यरात्री हे तिघेही दुचाकीने सावरगाव (गोरे) परिसरातून जात होते. अचानक त्यांच्या दुचाकीची झाडाला धडक लागली.

या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. विशेष म्हणजे जवळा येथील हे तिघे युवक खंडाळा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याकरिता निघाले होते. मृतक भगवान भालेराव यांच्या पत्नीच्या बहिणीची गावातील मुलांनी छेड काढली होती. त्याची तक्रार देण्याकरिता ते जात होते. रस्त्यातच दुचाकीने झाडाला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, हा अपघात की घातपात, अशी चर्चा उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित नागरिकांमध्ये व्यक्‍त केली जात होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here