पारशिवनी : मोबाइल फोन न दिल्याने दोन मित्रांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. भांडण मिटल्यानंतर तरुणाला पुन्हा घरून बोलावले व शिवीगाळ करित त्याच्या डोक्यावर बांबूच्या काठीने जोरात वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी शहरात शुक्रवारी (दि. २२) रात्री १०.२० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे.
प्रीतम ऊर्फ मोनू विजय कामडे (२३, रा. पालोरा, ता. पारशिवनी) असे मृताचे नाव आहे. प्रीतम व १७ वर्षीय विधिसंघर्षम्रस्त बालक एकाच गावातील (पालोरा) रहिवासी असून, ते मित्र होते. दोघेही शुक्रवारी रात्री ७.3० वाजताच्या सुमारास पारशिवनी शहरातील पानटपरीवर आले होते. त्यावेळी प्रीतमने विघिसंघर्षग्रस्त बालकास त्याचा मोबाइल फोन मागितला. मोबाइल फोन चार्ज नसल्याचे सांगून विधिसंघर्षग्रस्त बालकाने त्याला मोबाइल फोन देण्याचे टाळले.
मोबाइल फोन न दिल्याने दोघांमध्ये भांडण झाले. भांडण शांत होताच दोघेही गावाला निघून गेले. त्यानंतर रात्री १०.३० वाजताच्या सुमारास विधिसंघर्षग्रस्त बालकाने प्रीतमला पुन्हा पारशिवनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोलावले. तो चौकात येताच विघधिसंघर्षग्रस्त बालकाने त्याला शिवीगाळ करीत शेजारी पडून असलेला बांबूचा दांडा उचलून प्रीतमच्या डोक्यावर वार करायला सुरुवात केली.
यात प्रीतम गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी लगेच पारशिवनी शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर त्याला नागपूर शहरातील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती खालावत असल्याने त्याला मेयो रुग्णालयातून नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे शनिवारी (दि. २३) सकाळी ७ वाजताच्या सुमारास प्रीतमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा पळनाटे करीत आहे.