आष्टी (शहीद) : वर्घपूर येथील सिंधू दिलीप पोटे यांना मानेचा आजार असून उपचारासाठी त्या साहुर येथील डॉ. आर. बी. तालन यांच्याकडे गेल्या. तपासणी अंती डॉक्टरांनी मुदतबाह्य इंजेक्शन दिल्याने महिला रुग्णाची प्रकृती बिघडली. ही बाब लक्षात येताच आष्टी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली.
बुधवारी सिंधू पोटे साहुर येथील डॉ. तालन यांच्या दवाखान्यात गेल्या. त्यांना मानेचा आजार असल्याने डॉक्टरांनी त्यांना एक इंजेक्शन दिले आणि दुसरे इंजेक्शन सोबत दिले. गुरुवारी सिंधु पोटे या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वडाळा येथे गेल्या. वैद्यकीय अधिकारी डॉ. केचे यांच्याकडे हे इंजेक्शन दिले. डॉक्टरांनी बारकाईने पाहणी केली असता खासगी डॉक्टरांनी दिलेले डायक्लोफिनॅक इंजेक्शन मुदतबाह्य असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, रुग्णाची प्रकृती बिघडल्याने पोटे कुटुंबीयांनी आष्टी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली आहे.