कारंजा (घाडगे) : वाढदिवसाच्या मेजवाणीनंतर बेधूंद कारने येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला धडक दिली. या प्रकरणातील फरास असलेल्या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने अखेर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासमोर समर्पण केले आहे. त्यामुळे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जात असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
कारंजा पोलीस स्टेशनमधील कर्मचारी पवन लव्हाळे व त्याचे काही मित्र तळेगाव जवळील हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या मेजवाणीसाठी गेले होते. पण परतीच्या प्रवासादरम्यान राजनी पेट्रोलपंप जवळ पवन लव्हाळे चालवत असलेल्या कारने शेतकऱ्याला धडक दिली. यात साहेबराव धुर्वे याचा जागीच मृत्यू झाला तर दिलीप परतेती हे जखमी झाले.
अपघातानंतर पवन लव्हाळे व त्याचे इतर मित्रांनी घटनास्थळावरून यशस्वी पळ काढल्याने शहरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. अशातच आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने अखेर आर्वी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे समर्पण केल्याने विविध प्रकारच्या चर्चेला पूर्णविरम मिळाला आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
चार दिवसांचा पीसीआर
आरोपी पोलीस कर्मचारी पवन लव्हाळे यांच्यासोबत कोण होते या बाबतची अधिकची माहिती पोलीस घेत आहेत. अटकलेल्या कारवार्डनंतर आरोपी पवन याला कारंजा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.