वर्धा : मार्च, एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याच हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. शासनाच्या याच आदेशान्वये वर्धा जिल्हा प्रशासनाला ३९ लाख २४ हजार ५०० रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, तो जिल्ह्यातील ४६७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळता केला जात आहे.
वर्धा जिल्ह्यात मान्सून दाखल होण्यापूर्वी मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या दिवसांत वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, तसेच कारंजा (घा.) तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे उभ्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे सर्वेक्षण करून शासकीय मदतीची मागणी होताच, महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून तालुका प्रशासनाला आपला अहवाल सादर केला. त्यानंतर, तालुका प्रशासनाने त्यावर योग्य कार्यवाही करून सदर प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला.
जिल्हा प्रशासनानेही हवालदिल शेतकऱ्यांच्या विषयी सहानुभूती दाखवत सदर प्रस्ताव तातडीने शासनाला सादर केला. त्यानंतर, आता राज्य शासनाने या विषयी सहानुभूतीपूर्वक विचार करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासकीय मदत जाहीर करून, वर्धा जिल्हा प्रशासनाला ३९ लाख २४ हजार ५०० रुपयांचा निधी दिला आहे. तो जिल्हा प्रशासनाला तालुका प्रशासनाकडे वळता केला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासकीय मदतीची रक्कम वळती केली जात आहे. कुठलाही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
आर्वी तालुक्यात सर्वाधिक नुकसान
मार्च, एप्रिल व मे महिन्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले. वर्धा तालुक्यातील १४.३० हेक्टर, सेलू तालुक्यातील ७.३० हेक्टर, देवळी तालुक्यातील ३.२५ हेक्टर, आर्वी तालुक्यातील २५२.०७ हेक्टर तर कारंजा तालुक्यातील २ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते, तशी नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.