वर्धा : दशक्रियेच्या कार्यक्रमानंतर दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीत नाव उलटल्याने तारासावंगा येथील पाच व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला होता. ही घटना अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील झुंज या पर्यटनस्थळी घडली होती. याच घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून दोन लाख प्रतिव्यक्ती शासकीय मदत मंजूर झाली असून, ही रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. सदर रक्कम मृतांच्या वारसांच्या बँक खात्यात येत्या ७२ तासांत वळती होणार आहे.
झुंज येथे घडलेल्या घटनेत अकरा व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला. यात वर्धा जिल्ह्यातील तारासावंगा येथील अतुल गणेश वाघमारे (२५), वृषाली अतुल वाघमारे १९), आदिती सुखदेव खंडाळे (१३), मोहिनी सुखदेव खंडाळे (२२) व अश्विनी अमर खंडाळे (२५) यांचा समावेश होता. गौरी विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती.
ही घटना संपूर्ण राज्यात बहुचर्चित ठरली. मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्याची मागणी झाल्यानंतर शासनानेही त्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबींयांना मंजूर केली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे १० लाख जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, ही रक्कम येत्या ७२ तासांत मृतांच्या वारसांच्या बँक खात्यात वळती होणार आहे.
तहसीलदारांचा प्रस्ताव ठरला महत्त्वाचा
झुंज येथील घटनेनंतर आष्टी येथील तहसीलदारांनी आर्वी येथील उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी यासाठी प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनीही तातडीने कार्यवाही करून तो प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. त्यानंतर आता राज्य शासनाकडून शासकीय मदत मंजूर झाली आहे.
मृतांत सख्या बहिणींचा समावेश
झुंज येथे गेलेल्या तारासावंगा येथील पाच जणांना नाव उलटल्याने जलसमाधी मिळाली. जलसमाधी मिळालेल्यांत दोन सख्ख्या बहिणी, तसेच एक नवदाम्पत्य आणि एका नवविवाहितेचा समावेश आहे. विशेष म्हणजे गौर विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेत तब्बल आठ महिलांना जलसमाधी मिळाली होती.