कारंजा (घाडगे) : तालुक्यातील सावरडोह, तरोडा येथे शेतातील पिकांचे मोगलगाय या कीडवर्गीय अळीने पिकांचे मोठे नुकसान केले असून मिरची, वांगी, टोमॅटो, संत्रा पिकांची रोपे नष्ट केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही बाब संदीप भिसे यांनी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना फोनद्वारे सांगितले असता कृषिमंत्र्यांनी याची दखल घेत तत्काळ नागपूर येथून पंजाबराव कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांची चमू सावरडोह येथे पाठवून तेथील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा करीत उपाययोजना करण्याबाबतचे मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी कोबी, भेंडी, चवळी यासारख्या पालेभाज्यांची लागवड केल्यानंतर लगेच रात्रभरात ती पिके नष्ट होताना दिसून येत आहेत. सावरडोह, तरोडा येथील शेतकऱ्यांवर ही परिस्थिती निर्माण झाली असून त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. शिवसेनेचे संदीप भिसे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना याबाबतची माहिती देत सावरडोह व तरोडा येथील शेतातील पिके मोगलगायींमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले. कृषिमंत्र्यांनी नागपूर येथून पंजाबराव कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांची चमू सावरडोह येथे लगेच पाठवून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची व संत्रा झाडांची पाहणी केली. शेतकऱ्यांसोबत चर्चा करून उपाययोजना करण्याचा सल्ला दिला.
कारंजा तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आधीच शेतकऱ्यांची सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झाले. त्यातच या नवीन गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना जगणे कठीण झाले असल्याचे काही शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखविले. शेतीची पाहणी करतेवेळी उपविभागीय कृषी अधिकारी सतीश सांगळे, पंजाबराव कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. सवई, डॉ. वडसकर, डॉ. तांबे, डॉ. धोंडे, कारंजा कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने, मंडळ कृषी अधिकारी प्रशांत भोयर, कृषी सहायक अंभोरे, शेतकरी संदीप भिसे, गुड जाधव, सुनील रणनवरे, गोलू मोह राजू जोरे, गजानन धडाळे, भूषण कडू यांच्या शेतात जाऊन पाहणी करीत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी परिसरात शेतकऱ्यांची उपस्थिती होती.