वर्धा : घर बांधकामासाठी उसनवारीने घेतलेल्या 3 हजार रुपयांपैकी केवळ ५०० रुपये न दिल्याने रूपेश खिल्लारे रा. इतवारा याची हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री ८.3० वाजताच्या सुमारास इतवारा परिसरातील मच्छी मार्केटजवळ घडली. या प्रकरणी आरोपी नीलेश वालमांढरे याला शहर पोलिसांनी अटक करून त्याची पाच दिवसीय पोलीस कोठडी मिळविली आहे.
रूपेश खिल्लारे याने आरोपी नीलेश वालमांढरे याच्याकडून घर बांधकामासाठी तीन हजार रुपये उसने घेतले. रूपेशने यातील दोन हजार ५०० रुपये आरोपी नीलेश याला परत केले होते. केवळ ५०० रुपये देणे बाकी होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास नीलेश हा रूपेशला ५०० रुपये मागण्यासाठी गेला असता दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान संतापलेल्या नीलेशने रूपेशच्या पोटात चाकू भोसकून त्याची हत्या केली.
याबाबतची तक्रार मृत रूपेशची पत्नी संगीता हिने शहर पोलिसात दाखल केली. शहर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत अव्यघ्या काही तासांतच आरोपी नीलेश वालमांढरे यास ताब्यात घेत अटक केली. मंगळवारी आरोपी नीलेश वालमांढरे याला न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला, पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गशिनात सुरू आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ. प्रवीण झोपाटे यांनी केले.