वर्धा : आर्थिक देवाण घेवाणीतून ६५ वर्षीय वृद्धाची हत्या करून त्याचा मृतदेह सिमेंट खांबाला बांधून रोठानजीकच्या तलावालगतच्या कॅनॉलमध्ये फेकून देण्यात आला. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि सावंगी ठाण्याच्या पोलिसांनी समांतर तपास करून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांनी दिली. वसंत चोखोबा हातमोडे (६५, रा. पालोती) असे मृतकाचे नाव आहे.
वसंत हातमोडे हा ५ ऑक्टोबर मंगळवारपासून बेपत्ता होता. याबाबत मुलगा नीलेश हातमोडे याने सावंगी ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून मिसिंग दाखल करण्यात आली होती. रविवारी दुपारी ४ वाजता एका मासेमाऱ्याला दुर्गधी आल्याने त्याने याची माहिती सावंगी पोलिसांना दिली.पोलिसांनी तत्काळ रोठा तलाव परिसरातील गेट २च्या चेंबरमधील विहिरीची पाहणी केली असता एक सिमेंटचा खांब दिसून आला.
पोलिसांना मोठ्या अडचणीनंतर खांब बाहेर काढला असता खांबाला बांधून मृतदेह वर आला. पोलिसांनी रविवारी मध्यरात्री खुनाचा गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखा, सावंग्री पोलिसांनी पालोती शहरातील – नागरिकाला फोटो दाखविला असता त्याच्या मुलाने कपड्यावरून ओळख पटविली असता तो मृतदेह वसंत हातमोडे याचा असल्याचे समजले. वसंत हातमोडेवर २०१९ मध्ये पुलगाव ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यात असलेल्या आरोपींनी आर्थिक देवाणघेवाणीतून त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात, ठाणेदार संजय गायकवाड, बाबासाहेब थोरात, एपीआय महेंद्र इंगळे, पीएसआय सौरभ घरडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.