वर्धा : मारहाणीच्या प्रकरणात फरार असलेल्या कथित ‘भाई’ने एक दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून ‘कल वर्धा शहर गरम करना है’ अशी पोस्ट टाकून दुसऱ्या दिवशी शहरात धुमाकूळ घालत कारागृह परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला केला. या कथित ‘भाई’ला शहर पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्या असून, तो सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, गुडु लोखंडे वा कथित ‘भाई’ने हिंदनगर परिसरात असलेल्या मंदिरासमोर प्रफुल्ल ताकसांडे याला चाकूने मारहाण केली होती. याप्रकरणी रामनगर पोलिसांत गुडु लोखंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात तो फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच रात्री गुडुने सोशल मीडियावर पोस्ट टाकून ‘कल वर्धा शहर गरम करना है’… अशी पोस्ट टाकली.
दुसऱ्या दिवशी फरार असलेल्या गुडुने शहरात चांगलाच धुमाकूळ घातला. गुडुने रामनगर पोलीस ठाण्यात जात शिवीगाळही केल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर त्याने शुक्रवारी कारागृह परिसरातही चाकूच्या धाकावर धुमाकूळ घातला. मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचारी जनार्धन धोटे हे कारागृहातील कैदीला तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जायचे असल्याने ते कारागृहात पोहोचले असता त्यांना कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन युवक धुमाकूळ घालत असल्याचे दिसले.
पोलीस कर्मचारी धोटे यांनी त्यास हटकले असता, गुडु लोखंडे याने त्याच्याजवळील चाकूने धोटे यांच्या चेहऱ्यावर वार करीत जखमी केले. दरम्यान, दोघानी तेथून पळ काढला. जखमी झालेल्या जनार्धन धोटे यांना तत्काळ सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या कथित “भाई’वर रामनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीही हाणामारी, दारूविक्री आदी गंभीर गुन्हे दाखल असून, पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.