आर्वी : पंतप्रधान घरकूल योजनेच्या पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली असून याचे वाचन सुद्धा झाले. मात्र या दोन्ही याद्यांमध्ये विधवा महिलांचे नाव समाविष्ट नाही. यामुळे संतप्त झालेल्या महिला थेट पंचायत समितीवर धडकल्या. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मडावी यांच्यासमोर त्यांची बाजू मांडली.
कविता विजय ढोबळे, अलका अमोल शेंडे, प्रणाली प्रवीण देव्हारे, भाग्यश्री जजानन बुरे, कांता झनक चौधरी, कलावती प्रभाकर पोटफोडे, सुशीला नामदेव सहारे, सुलोचना ज्ञानेश्वर चातरकर, मीना पंजाबराव कांबळे. अंजना भगवान मांढरे अशी अर्जदार विधवा महिलांची नावे असून आमचे अर्ज गेले कुठे, असा त्यांचा संतप्त सवाल आहे.
कुडामातीच्या व उघड्यावर राहणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचे चांगल्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, याकरिता केंद्र सरकारने मोठा गजावाजा करीत पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) कार्यान्वित केली, मात्र ही योजना फसवी ठरत आहे. या योजनेंतर्गत विविध महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. परंतु नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या यादीमधून त्यांचीच नावे डावलली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशासनाने मागणी केल्याप्रमाणे या विधवा महिलांनी विरुळ ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल केले आहे. त्यांची राहती घरे कुडामातीची आहेत. काहींच्या घराचे छप्परसुद्धा पडलेले आहे. अनेकांच्या मातीच्या भिंती शिकस्त झाल्या आहेत. रोजमजुरीशिवाय दुसरा कुठलाच उद्योग नाही. दुचाकी नाही. अपात्रतेकरिता शासनाने ठरवून दिलेल्या १६ निकषांत त्या कुठेच बसत नाहीत, असे असतानासुद्धा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पात्र व अपात्र यादीत कुठेच नाव नसल्यामुळे त्यांनी येथील पंचायत समितीमध्ये धडक दिली. यावेळीसेनेचे उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव यांनी गटविकास अधिकारी मडावी यांच्यापुढे बाजू मांडली. यावेळी त्यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले.