वर्धा : किराणा दुकानात काम करीत असतानाच कामावरील युवकाला वीजप्रवाहाचा जोरदार झटका लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना वायगाव (नि.) येथे रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. अनिकेत प्रकाश हिंगे (१९ असे मृत युवकाचे नाव आहे.
अनिकेत हा गावातीलच एका किराणा दुकानात कामावर होता. दुकानमालकाने रात्रीच्या सुमारास अनिकेत हिंगे तसेच दुकानातील इतर तीन युवकांना साहित्य बरोबर ठेवण्यास सांगितले. चौघेही काम करीत असताना त्यांना वीजप्रवाहाचा झटका लागला. इतर तिघे फेकले गेले तर अनिकेत याला जबर झटका लागला. त्याला गावातीलच रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी वर्धा येथील सामान्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. इतर तीन युवक मात्र सुदैवाने बचावले. अनिकेतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, या घटनेची नोंद देवळी पोलिसांनी घेतली आहे.