मांडगाव : महाकाळी येथील धाम प्रकल्प १०० टक्के भरला असून, सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होत असल्याने, सध्या धाम नदी दुथडी भ्ररून वाहत आहे. अशातच तरोडा येथील शेतकरी दीपक तिमांडे यांच्याकडील गडी बैलगाडीने आष्टा-तरोडा या दोन गावांच्या मध्यातून गेलेली वर्धा नदी ओलांडत असताना, बैलगाडीसह चार पाळीव जनावरे पाण्याचा जोरदार प्रवाहामुळे वाहून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
तरोडा येथील दीपक तिमांडे यांची शेती आष्टा शिवारात आहे. आष्टा- तरोडा या दोन गावांच्या मध्यातून धाम नदी वाहते. नदीवर पूल नसल्याने शेतकऱ्यांना नदी पात्रातूनच ये-जा करावी लागते. रविवारी सायंकाळी उशिरा दीपक तिमांडे यांचा गडी बैलगाडी घेऊन शेतातून घरी येत होता. बैलगाडीला बैलजोडीसह गाय व गोऱ्हा बांधलेला होता.
नदी पात्रातून बैलगाडी काढत असताना, अचानक बैलगाडी वाहून जात असल्याचे लक्षात येताच, दीपक तिमांडे यांचा गडी कुमरे याने बैलगाडीवरून उडी घेत स्वत:चा जीव वाचविला, पण बैलगाड़ीसह बैलजोडी, गाय व गोऱ्हा पुराच्या पाण्यात गेल्याने शेतकरी तिमांडे यांचे लाखांचे नुकसान झाले आहे. वाहून गेलेल्या जनावरांचा शोध घेणे सुरू असताना, सोमवारी सकाळी गाय व गोऱ्ह्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.