वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार सध्या रामभरोसे असून नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेला चक्क तीन तास ताटकळत ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठविण्यात आले आहे.
मंगळवार २८ सप्टेंबरला सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास देवळी तालुक्यातील चिखली येथील एक गर्भवती महिला प्रसूतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली. पण डॉक्टर यायचे असल्याचे कारण पुढे करून तिला ताटकळत ठेवण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणीअंती तिला प्रसूतीला वेळ असल्याचे सांगत सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
या महिलेची सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात प्रसूती झाली असली तरी असे प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयात नेहमीच घडत असल्याचा आरोप शिवसेनेचे देवळी तालुका प्रमुख घनश्याम वडतकार यांनी केला.