वर्धा : रोहित बैसच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या शुभम मडावी याची त्याच्याच मावसभावाने व मित्रांनी हत्या करून हातपाय दगडाने बांधून मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती.
या प्रकरणातील चारही आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. नयन शांताराम कदम, राहुल ऊर्फ अंधा वसंता चावरे, योगेश ऊर्फ भालू मोहन सूर्यवंशी, इम्मू ऊर्फ इमरान जिमल शेख सर्व रा. इतवारा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.
मृतक शुभम मडावी आणि त्याचा मोठा भाऊ शिवा मडावी यांनी २०१९ मध्ये रोहित बैस याची हत्या केली होती. या प्रकरणात दोघेही भाऊ कारागृहात होते. तीन महिन्यांपूर्वी शुभम जामिनावर बाहेर आला होता. तेव्हापासून आरोपी हे शुभमच्या घरी जाऊन त्याला व त्याच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत होते. अखेर शुभम मडावी याने रामनगर परिसरात खोली घेत तेथे वास्तव्य सुरू केले.
शनिवारी २५ रोजी शुभम मडावी हा रात्री १० वाजताच्या सुमारास इतवारा येथे त्याच्या मित्रांना भेटण्यास गेला होता. संकेत बैस हा त्याला धमकी देत असल्याचे त्याने त्याच्या आईला सांगितले होते. मात्र, तो परतलाच नाही. आरोपींनी त्याला ऑटोत बसवून चाकूने भोसकून त्याची हत्या करीत त्याचा मृतदेह दगडाने बांधून स्मशानभूमी मार्गावरील नाल्यात फेकून दिला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत.