वर्धा : सरकारी जागेवर स्वत:चा मालकीहक्क दाखवून तीच जमीन सुमारे २४ ते ३० जणांना परस्पर विकून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार सेलूचे नाय तहसीलदार राम मनोहर कांबळे यांनी सेलू पोलिसांत दिली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
झडशी येथील रहिवासी आरोपी अशोक अवधूत वैरागडे, प्रभाकर नाना वैरागडे, महादेव नाना वैरागडे यांनी सरकारी जागेवर आपला मालकीहक्क दाखवून ती जमीन तब्बल २५ ते 3० लोकांना विक्री करून लाखो रुपयांचा अपहार करीत शासनाची फसवणूक केली. ही बाब नायब तहसीलदार कांबळे यांच्या निर्दशनास येताच त्यांनी याबाबतची तक्रार सेलू पोलिसांत दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड करीत आहेत.
सध्या जिल्ह्यात दुसऱ्यांच्या किंवा स्वतहाचा मालकी हक्क दाखवून शासकीय जमिनीवर कब्जा करण्याचे प्रकार जोरात सुरु आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी अशा प्रकरणात स्वत: दखल घेत एक कमेटी नेमण्याची गरज आहे. ही कमेटी अशा सार्वजनिक मालमत्तांची तपासणी करुन कुणाचा कब्जा आहे का, हे पाहण्याचे काम करेल.