देवळी : येथील नगरपालिका कार्यालयाचे कामकाज पूर्ववत तळमजल्यावर आणावे, याकरिता युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने सोमवारी महादेवराव ठाकरे पुतळा ते पालिका कार्यालयापर्यंत लोटांगण घालून लक्ष वेधले. यावर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्षांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले. यादरम्यान आंदोलनकर्त्यांनी नगराध्यक्षा सुचिता मडावी यांना वेठीस धरल्याने त्यांनी पदाचा राजीनामा देण्याची धमकी दिली. यामुळे कक्षामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
युवा संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते लोटांगण घालत नमरपालिकेत गेल्यानंतर या विषयावर तोडगा काढण्यासाठी पालिका पदाधिकाऱ्यांसोबत विचारविनिमय व्हावा, म्हणून बैठकीचे आयोजन केले. यावेळी नगराध्यक्ष सुचिता मंडावी, उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर तर संघर्ष मोर्चाकडून नगरसेवक पवन महाजन व गौतम पोपटकर उपस्थित होते.
चर्चेदरम्यान पालिकेतील काही विभागांचे कामकाज तळमजल्यावर आणण्याचा निर्णण पालिका पदाधिकाऱ्यांनी घेतला, परंतु ही बाब मान्य नाही. संपूर्ण कामकाज तळमजल्यावर आणा, या मागणीवर मोर्चेकरी ठाम राहिले. हा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने घेण्यात आला असताना नगराध्यक्षाला यासाठी जबाबदार धरणे योग्य नाही. संघर्ष मोर्चाच्या काही व्यक्ती दबावतंत्राचा वापर करीत असल्याचा आरोप करून नगराध्यक्षांनी राजीनामा देण्याची धमकी दिली.
सर्वसाधारण सभेच्या ठरावाद्वारे पालिकेचे कार्यालय वरच्या माळ्यावर हलविण्यात आले. परंतु, हा निर्णय वृद्धांसह दिव्यांगांसाठी अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला. मागणीच्या पूर्ततेसाठी दीड महिन्यापासून साखळी उपोषण सुरू आहे. परंतु अद्याप तोडगा निघाला नसल्याने आंदोलनाला धार दिली जात आहे. सोमवारी किरण ठाकरे, प्रवीण कात्रे, रमेश डोंगरे, प्रफुल रोकडे व संजय पोकळे यांनी लोटांगण घातले. मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.