वर्धा : लंडन येथून भारतात येत असल्याचे सांगून करस्टमड्युटी भरायला तसेच विविध कारणे देत सेवानिवृत्त लेखा अधिकाऱ्याला ७ लाख १७ हजार रुपयांना ऑनलाईन गंडविल्याची घटना बोरगाव येथील गणेशनगर परिसरात घडली.
प्रात माहितीनुसार, निवृत्त लेखाधिकारी दिनेश मुकुंद भेले यांना डॉ. लियान अर्वल यांनी फोन करुन मला भारतात येऊन दवाखाना टाकायचा असल्याने जमीन खरेदी करायची आहे, असे सांगून दिनेशसोबत ओळख वाढविली होती, दोघांमध्ये संवाद सुरु झाला. पुढे तिने मी भारतात येत असल्याचे सांगून विमानतळावरील छायाचित्रही दिनेशच्या मोबाईलवर पाठविले. काही तासांनी महिलेने मला कस्टम ड्युटी भरावयाची असल्याने ९५ हजार रुपयांची पहिल्यांदा मागणी केली. नंतर क्लिअरन्सच्या नावे काही रक्कम मागून ती जमा करण्यासाठी खाते क्रमांक मागितला.
त्यानुसार दिनेशने वेळोवेळी रक्कम पाठविली. अशी एकूण सात लाख १७ हजार रुपयांची रक्कम दिनेश यांनी डॉ. महिलेच्या खात्यात जमा केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे कळताच दिनेश भेले यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सत्यवीर बंडिवार करीत आहेत.
सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. पोलीस विभाग वारंवार जनजागृती करताना दिसून येत आहे. मात्र, फसवणुकीच्या घटना चिंताजनक आहे.