

सिंदी (रेल्वे) : येथील शेतकरी मुरलीधर कलोडे यांच्या मौजा पीपरा शेतशिवारातील शेतात बांधुन असलेल्या बैलजोडीवर शनिवारी (ता.२५) झालेल्या रात्रीच्या मुसळधार पावसात वीज पडुन जागीच दोन्ही बैल मरण पावल्याची घटना रविवारी (ता.२६)सकाळी सालगड्डी शेतात गेल्यावर उघडकीस आली.
सिंदी रेल्वे येथील शेतकरी मुरलीधर बळीरामजी कलोडे यांची मौजा पीपरा शिवारात शेती. असुन तेथेच त्यांचा गोठा असल्याने शेतातच गुरेढोरे आणि शेती साहित्य व गुरांचा चारा ठेवण्याची व्यवस्था आहे. मागील आठवडाभरापासून सिंदी परिसरात पाण्याची सततधार सुरू असुन सोयाबीन कापणीला आले असून पाऊसाने अतोनात नुकसान होत आहे.
शनिवारी (ता.२५) परिसरात दिवसभर उघडदिप दिली मात्र सांयकाळी मेघगर्जनेसह रिपरिप पाऊसाला सुरवात झाली. थोड्याच वेळात पाऊसाचा जोर प्रचंड वाढला आणि वीजाचा कडकडात सुध्दा मोठ्या प्रमाणात होऊ लागला अशातच एक वीज मोठ्याने कराडली तेव्हाच शहरातील बहुतेकांना वाटले की ही वीज नक्कीच कोठेतरी परिसरात पडली.
सकाळी नेहमीप्रमाणे कलोडे यांचा सालगड्डी शेतात झाडझुडीसाठी गेला असता दोन्ही बैल जागीच मरुन पडलेले दिसले. रात्रीच्या काळोखात काळाने या मुक्या प्राण्यावर आघात केला आणि खुट्याच्याखुट्यालाच बांधल्याबांधल्या एक लक्ष पन्नास हजार रुपये किमंतीच्या बैल जोडीने प्राण सोडले.
हंगामाच्या तोंडावर पावसाने प्रचंड नुकसानीचा सामना करीत असलेल्या या शेतकर्यावर अस्मानी संकटाने दोहेरी आघात केल्याने जबर आर्थिक संकट कोसळले आहे. शासणाने ताबडतोब आर्थिक मदत करुन शेतकर्याला सावरण्याचा प्रयत्न करावा अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.