वर्धा : सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हावरे ले-आऊट येथील विनोद कोल्हे यांच्या कुलूपबंद घराला टार्गेट करून चोरट्यांनी २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, तर सिंदी रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नंदपूर येथील उमाकांत जिकार यांच्या घरातून रोख १५ हजार रुपये लंपास केल्याची घटना तक्रारीनंतर उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.
हावरे ले-आऊट येथील विनोद कोल्हे यांच्या घरातून चोरट्यांनी सोन्याची अंगठी, तोरड्या, जोडवे, लॅपटॉप, मोबाईल असा २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी विनोद कोल्हे यांच्या तक्रारीवरून सेवाग़राम पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर सिंदी रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नंदपूर येथील उमाकांत जिकार यांच्या घरातील तिजोरीतून चोरट्याने १५ हजारांची रोख चोरून नेली. या प्रकरणी उमाकांत जिकार यांनी सिंदी पोलिसात तक्रार नोंदविली आहे. तक्रारीत संशयित आरोपी म्हणून कवडू मेश्राम याचे नाव नोंदविण्यात आले असून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.