वर्धा : नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या इंदापूर गावात शेताच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणी केली. यावेळी त्यांनी ई पीक पाहणी सॉफ्टवेअरमध्ये कश्या पध्दतीने पिकांच्या नोंदी कराव्या लागतात, याचे प्रात्यक्षिक करुन पाहिले.
यावेळी जिल्हाधिकारी प्ररेणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते. श्रीमती लवंगारे म्हणाल्या की, ई पीक पाहणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून स्मार्ट मोबाईलच्या सहाय्याने शेतकऱ्यांना स्व:त त्यांच्या शेतातील पीकांच्या नोंदी करता येऊ शकते. पोर्टलवर नोंदी ह्या सहजरित्या करता येऊ शकतात. पोर्टलवर सर्व सूचना या मराठी भाषेत दिल्या आहेत. ई पीक पाहणी हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असून शेतकऱ्यांना फायदेशीर आहे.
महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जाऊन ग्रामस्थांना या योजने संदर्भात व्यापक जनजागृती करावी. शासनाचा स्तुत्य उपक्रम असल्याने गावातील तरुण शेतकऱ्यांनी तसेच युवकांनी पोर्टलवर नोंदी करताना अडचण येणाऱ्यांना सहाय्य करावे, असे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले. यावेळी विभागीय आयुक्तांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून पीक नोंदी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
कान्हापूर येथे स्वामित्व योजनेची पाहणी…
सेलू तालुक्यातील कान्हापूर या गावाला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन स्वामित्व योजने अंतर्गत होणाऱ्या कामांची पाहणी केली. भूमी अभिलेख विभागाकडे असणाऱ्या नकाश्याची त्यांनी पाहणी केली व अनुषंगिक माहिती जाणून घेतली. ड्रोन सर्वेक्षण करताना प्रत्येक बाबींचा नीट आराखडा व नियोजन करण्यात यावे. योजने अंतर्गत गावठान जमीनीचे मालकी हक्क देताना सर्व पुरावे तपासण्यात यावे. कोणाचीही तक्रार येऊ नये, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी प्ररेणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, सरपंच रेखा माहाकाळकर, उप अधिक्षक श्री. ठूबे, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांच्यासह शेतकरी बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते.