वर्धा : अल्पवयीन मुलीचा छळ करीत तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपींना दंडासह कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.व्ही. आदोने यांनी दिला.
आरोपी मिथुन उर्फ यशवंत चहांदे हा एक वर्षापासून पीडितेचा पाठलाग करायचा. शिवाय पीडितेला लाज येईल असा बोलायचा. पीडितेने या प्रकाराची माहिती तिच्या आई-वडिलांना सांगितल्यावर मिथुन याला समज देण्यात आली. पण २१ सप्टेंबर २०१६ रोजी पीडित ही शिकवणीला जाण्यासाठी निघाली असता त्याने तिचा पाठलाग केला. तर सायंकाळी पीडित ही तिच्या कुटुंबीयांसह घरी असताना आरोपी बाप्या उर्फ विक्रांत वासनिक याच्या गाडीवर मिथुन उर्फ अमित चहांदे, राहुल प्रकाश इंगोले हे आले.
पीडिताच्या आजीने तू माझ्या नातीला का त्रास देतो, असे म्हणताच या तिघांनी पीडितेच्या घरावर दगडफेक केली. तर बाप्या उर्फ विक्रांत याने लोखंडी रॉडने पीडितेच्या वडिलांना मारहाण करून पीडित व पीडितेच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक वासुदेव बोंदरे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणात एकूण १२ साक्षदारांची साक्ष तपासण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी आरोपी मिथुन उर्फ अमित यशवंत चहांदे (रा. नागसेननगर, नालवाडी) यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ नुसार १ वर्षाचा सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त २ महिन्यांचा साधा कारावास आणि भादंविच्या कलम २९४ नुसार दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
आरोपी राहुल प्रकाश इंगोले (रा. मिलिंदनगर, म्हसाळा) यास भादंविच्या कलम ३२४ नुसार तीन महिन्यांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांचा साधा कारावास आणि भादंविच्या कलम २९४ नुसार दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तर आरोपी बाप्या उर्फ विक्रांत सुरेश वासनिक (रा. ज्ञानेश्वरनगर, म्हसाळा) यास भादंविच्या कलम ३२४ नुसार तीन महिन्यांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांचा साधा कारावास आणि भादंविच्या कलम २९४ नुसार दोन महिन्यांचा साधा कारावास ठोठावला. तसेच फौजदारी कलम ३५७ (१) अन्वये नुकसानभरपाई म्हणून एक हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेशित केले. पैरवी अधिकारी म्हणून साहाय्यक पोलीस निरीक्षक दिगांबर गांजरे यांनी काम पाहिले. शासकीय बाजू जिल्हा सरकारी वकील ॲड. गिरीश व्ही. तकवाले यांनी मांडली.