वर्धा : देवळी येथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भागवत देवीदास राऊत यांनी अंदोरी आणि पिंपळगाव येथे जात बोगस डॉक्टरांवर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
अंदोरी परिसरात बोगस डॉक्टर असल्याची माहिती मिळाल्याने डॉ. भागवत हे विलास लक्ष्मण नांदणे याच्या घरी गेले असता तो घरी मिळून आला. त्याची विचारपूस केली असता त्याच्याकडे डॉक्टरचा कुठलाही परवाना मिळून आला नाही. तसेच तो बनावट औषधी देऊन नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे दिसून आले.
तसेच पिंपळगाव लुटे येथे प्रभाकर लक्ष्मण रायमल याच्या घरी जात. पाहणी केली असता त्याच्याकडेही डॉक्टरकीचा कुठलाही परवाना नसल्याचे आढळून आले. बनावट औषधी नागरिकांना देत असल्याने त्यांच्याविरुद्ध देवळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्ह्यात अश्या बोगस डॉक्टरांची तपासणी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची आज नितांत गरज निर्माण झाली आहे.