

मांडगाव : शेडगाव-वर्धा मार्गावरील शंकर जोगे यांच्या पानटपरीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात पानटपरीतील साहित्य जळाल्याने जोगे यांचे सुमारे १ लाखांचे नुकसान झाले आहे. ही मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली.
मांडगाव येथील शंकर जोगे यांच्या मालकीची वर्धा मार्गावर पानटपरी आहे. ते खाद्यपदार्थांची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. याच पानटपरीला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. यात पानटपरीतील फ्रिज, खुर्ची, विविध खाद्यपदार्थ जळल्याने छोटे व्यावसायिक शंकर जोगे यांचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे.
पानटपरीतून धूर निघत असल्याचे याच मार्गाने जाणाऱ्या एका कार चालकाच्या निदर्शनास आले. त्याने त्याची माहिती शेजारील दुकानदाराला दिली. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी पानटपरीतील साहित्य जळल्याने जोगे यांचे मोठे नुकसान झाले आहे.