खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी रोखला रस्ता! दोन तास वाहतूक ठप्प

कारंजा (घाडगे) : मागील एक वर्षांपासून कारंजा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम युद्धपातळीवर पूर्ण व्हावे म्हणून मिक्सर प्लॅट गोंधळी येथे तयार करण्यात आला आहे. परंतु, ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्याची चाळण झाली असून, जीवघेणे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणाच्या निषेधार्थ आज शिवसेना व काँग्रेसच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शिवसेनेचे संदीप भिसे तसेच काँग्रेसचे टिकाराम घागरे व केशव चोपडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनामुळे कारंजा-भारसिंगी मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास खोळंबली होती. सुरुवातीला निवेदन देऊन खड्डे बुजविण्याची मागणी रेटली असता नाममात्र खड्ड्यांत माती टाकून खड्डे बुजवण्याचा देखावा करण्यात आला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी एकत्र येत काँग्रेस व शिवसेनेच्या नेतृत्त्वात रस्ता रोको करून रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजविण्याची मागणी एकमुखाने रेटली.

आंदोलनाची माहिती मिळताच कारंजाचे ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी आंदोलनस्थळ गाठून तालुका प्रशासनाला याची माहिती दिली. माहिती मिळताच बांधकाम विभागाचे पेंदे तसेच प्रभारी तहसीलदार राऊत यांनी आंदोलन स्थळ गाठून आंदोलनकर्त्यांची मागणी समजावून घेतली. ठोस आश्वासनाअंति आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. आंदोलनात शशिभूषण कामडी, राजू खवशी, चंद्रशेखर आत्राम, गोपाल गिऱ्हाळे, जीवन डोबले, दिलीप चौधरी, वाल्मीक ठाकरे, मेघराज खवशी, मंगेश डोबले, आजनादेवी गूळघाणे आदी सहभागी झाले होते.

आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच केले भजन

संतप्त आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजविण्याच्या मागणीकडे तालुका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरच बसून भजन सादर केली. या भजनांना खापरी येथील भजन मंडळींनी साथसंगत दिली.

आठ दिवसांत होणार रस्ता गुळगुळीत

आंदोलनकर्त्यांची मागणी समजावून घेतल्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत कारंजा-भारसिगी या मार्गावरील संपूर्ण खड्डे बुजविण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here