वर्धा : पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर ओव्हरटेकच्या नादात उलटला. अपघात होताच टँकरमधून पेट्रोलची गळती सुरू झाल्याने एकच तारांबळ उडाली होती. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वर्धा-पुलगाव मार्गावरील सालोड (हिरापूर) शिवारात घडली.
वर्धा-पुलगाव मार्गावरील दहेगाव शिवारात नायरा कंपनीचा पेट्रोल तसेच डिझेलचा डेपो आहे. याच ठिकाणाहून टॅकरमध्ये पेट्रोल भरून एम, एच. ४०, डी. एल. ९०९० क्रमांकाचा टँकर आपल्या नियोजित ठिकाणी जात होता. भरधाव टँकर सालोड शिवारातील नाल्याजवळ आला असता, टँकर चालकाने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. अशातच वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून पेट्रोल भरलेला टँकर थेट रस्त्याच्या कडेला शेतात शिरून उलटला.
यात टँकर चालकासह वाहनातील एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला. अपघात होताच टँकरमधून पेट्रोलची गळती सुरू झाल्याने टँकर चालकाची एकच तारांबळ उडली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी अपघाताची माहिती सावंगी पोलिसांना दिली. माहिती मिळताच सावंगीचे ठाणेदार बाबासाहेब थोरात यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून जखमींना सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केले.