कारंजा (घाडगे) : येथील नगर पंचायतीतील लिपिक अशोक महादेव जसुतकर (५०) यांनी शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कारंजा नगर पंचायतीच्या कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडली असून जसुतकर यांनी आत्महत्येसारखा कठोर निर्णय का घेतला, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची नोंद कारंजा पोलिसांनी घेतली आहे. कारंजा ग्रामपंचायत असताना अशोक जसुतकर हे लिपिक म्हणून कार्यरत होते. तर कारंजा नगर पंचायत झाल्यावर लिपिक म्हणून कायम ठेवण्यात आले. मनमिळाऊ स्वभावाचा धनी असलेले अशोक जसुतकर यांनी अनेकांच्या मनात आदराचे स्थान मिळविळे. नगर पंचायतीच्या लिपिकासह अशोक हे उत्कृष्ट तबला व हार्मोनियम वादक आणि गायक होते.
भाजीपाला आणण्यासाठी जातो असे म्हणून अशोक हे सकाळी ११ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी नगर पंचायत कार्यालय गाठून गळफास घेत आत्महत्या केली. नगर पंचायतीचे काम सुरू असून काही मजुरांनी अशोक यांनी गळफास घेतलेल्या खोलीत जाण्याचा प्रयत्न केला; पण दरवाजा उघडत नसल्याने त्यांना शंका आली. त्यांनी याची माहिती अधिकाऱ्यांना दिली.