

वर्धा : शहरी भागासोबतच ग्रामीण भागामध्येही गॅस सिलिंडर आता अत्यावश्यक झाला आहे. सणासुदीचे दिवस असतानाच या महिन्याच्या सुुरुवातीलाच सिलिंडरची २५ रुपयांनी दरवाढ झाली असून ग्राहकांना ९३६.५० रुपयांमध्ये सिलिंडर विकत घ्यावे लागत आहे. सध्या सिलिंडर हजारांच्या घरात पोहचली असतानाही काही डिलिव्हरी बॉयकडून सिलिंडर घरपोच आणून देण्याकरिता वीस रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याची ओरड होत आहे. त्यामुळे ही अतिरिक्त लूट कशाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाकाळातील आर्थिक फटका सहन करत असतानाच महागाईचा मारही बसत आहे. यामध्ये अत्यावश्यक असलेल्या गॅस सिलिंडरचे दरही दर महिन्याला २५ रुपयांनी वाढत आहेत. या सिलिंडरच्या दरवाढीने ग्राहकांच्या खिशावर दरोडाच घातला असून ते दर हजाराचा आकडा पार जाण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. अशातच एजन्सीमध्ये जाऊन सिलिंडर घेतल्यास मूळ दरात उपलब्ध होते. तर घरपोच आणून देण्याकरिता अतिरिक्त वीस रुपये आकारले जातात. ही शहरातील स्थिती असून ग्रामीण भागातील परिस्थिती यापेक्षा वेगळीच आहे. ग्रामीण भागात तर सिलिंडरवर शंभर ते दीडशे रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याची ओरड होत आहे.
वर्षभरात २०० रुपयांची वाढ
सिलिंडरची दरमहा २५ रुपयांनी वाढ होतांना दिसत आहे. जानेवारी महिन्यांमध्ये ७४६ रुपयांत मिळणारे सिलिंडर सप्टेंबर महिन्यात ९३६.५० रुपयांमध्ये विकत घ्यावे लागत आहे. यावर्षी जानेवारी महिन्यापासून जवळपास १९० रुपयांनी दरवाढ झाली आहे. सर्वाधिक दरवाढ मार्च महिन्यात झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीत दर कायम असताना मार्चमध्ये एकदम १०० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर दरमहा २५ रुपयांची दरवाढ सुरु आहे.