

वर्धा : शेतीचा खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे. उगवण शक्ती तपासून पेरणी करावी. यामुळे किती बियाणे लागेल याचा अंदाज येतो आणि अपेक्षेप्रमाणे उत्पादन घेता येते. बाहेरुन बियाणे विकत घेतल्यास त्याची उगवणक्षमता तपासल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांनी केले आहे.
बियाण्यांची पिशवी खालच्या बाजूने उघडून बियाणे काढावे. बियाने घेतांना दुकानदाराकडून पक्के बिल घ्यावे. आपल्या गावात 100 मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये. सोयाबिणची पेरणी बीबीएफवर करावे. बीबीएफवर लागवड करुन पेरणी केल्यास अति पाऊस झाला तर बाजूच्या खोल सरीमधून पाणी वाहून जाते आणि पावसामध्ये दीर्घ खंड पडल्यास बेड मधला ओलावा टिकून पीक तग धरुन राहते.
कपाशी पीक लागवडी करीता सुध्दा रुंद वरंबा सरी किंवा बीबीएफ पध्दतीने लागवड करावी. त्यामुळे अतिरिक्त पाणी सरीमधून वाहून जाण्यास मदत होईल. यामुळे कपाशीवर अचानक येणारा मर आणि लाल्या या रोगापासून नुकसान टाळणे शक्य होईल. रुंद वरंबा सरी पध्दतीमध्ये आंतर मशागत करणे, फवारणी करणे तसेच दर महिन्यात खताची मात्रा देणे सोईचे होईल. बीबीएफ वर लागवड केल्याने झाडांमध्ये पुरेसे अंतर राहून खेळती हवा राहते. यामुळे बोंडसडीचे प्रमाण कमी होते, असे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या वतीने कळविण्यात आले आहे.