पवनार : पवनार-गोंदापूर या पाणंद रस्त्याची दुर्दशा झाली असून त्या रस्त्याने पायी चालणेसुद्धा अवघड झाले आहे. खरिपातील पिके बहरली असून शेतकऱ्याला खतांची वाहतूक करावी लागत आहे. काही दिवसातच सोयाबीन, मूगसारख्या पिकांची काढणीपश्चात वाहतूक करावी लागणार आहे. मात्र, पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हे डोक्यावरूनच वाहून न्यावे लागणार आहे.
वर्धा-नागपूर मार्गाला जोडून असलेल्या या पाणंद रस्त्याच्या सुरुवातीलाच पंढरी ढगे यांचे शेत असून त्यांनी मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केलेली आहे. केळीच्या घडाच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध खोलगट भाग तयार तयार झाला आहे. पावसाचे पाणी या खोलगट भागात साचून चिखल होतो.
या शेतकऱ्याने शेतालगत आलेली रस्त्याची नाली बुनवून शेतातील पाणीसुद्धा रस्त्यावर काढल्याने रस्त्याची दुर्दशा झाल्याचा आरोप घनश्याम बोरकर, भगवंत ठोंबरे, राम ठोंबरे, भगवान पाटील, सीताराम पाटील, सुभाष भात, बंडू उमाटे, कवडू भोयर, रितेश उमाटे, रविशंकर मुडे, कुंभारे, सतीश ठोंबरे, दीपक लाकडे आदी शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत तहसीलदार वर्धा यांना तक्रार दिलेली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्यासह ढगे यांच्यामुळे रस्ता खराब झाल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.