

वर्धा : नवी दिल्लीत चाळीस हजार कोटी रुपये खर्चुन नवीन संसद भवन, पंतप्रधान बंगला बांधला जात आहे. महागाईच्या काळात पा प्रकार गरीबांच्या जखमेवर मिठ चोळणारा आहे. याचा तीव्र निषेध करून जाती अंत संघर्ष समिती व दलीत शोषण मुक्ती मंचचे जिल्हा प्रमुख नरेंद्र कांबळे यांनी कार्यकर्त्यांसह बढे चौक येथे निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने मागण्यांचे निवेदन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविले आहे.
संपूर्ण देश कोरोना महामारीने ग्रस्त झालेला आहे. सर्व भारतीय अत्यावश्यक औषधपाणी आणि जीव वाचविणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीपासून वंचित आहेत. शेतकरी आणि कामगार जगण्याच्या विवंचनेत असताना भाजपचे मोदी सरकार “ सेन्ट्रल व्हिस्टा” नावाची एक विलासी योजना अंमलात आणत आहे.
भारतीय संसद आणि राष्ट्रपती भवनाच्या परिसरात संसदेसह अतिशय भव्य, सुंदर आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या ओजस्वी इतिहासाच्या साक्षी असलेल्या सुस्थितीतील इमारती पाडून त्या जागी सेन्ट्रल व्हिस्टा नावाने नव्या इमारतींचे संकुल उभे करत आहे. आजच त्याचा खर्च २३ हजार कोटींवर गेला आहे. ते संकुल पूर्ण होईपर्यंत तो खर्च ४० हजार कोटी रुपयांवर जाणार आहे. या १५ एकरच्या संकुलात पंतप्रधानांसाठी १३ हजार ५०० कोटींचा महाल बनवला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुचनेप्रमाणे जागतिक मान्यता लाभलेले नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, कृषी भवन, विज्ञान भवन, उद्योग भवन, जवाहर भवन या इमारती पाडल्या जात आहे. पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानापासून संसदगृहापर्यंत भुयारी मार्ग खोदायचे काम चालू आहे. पंतप्रधानांना इतकी भीती कशाची वाटते आहे, नव्या दिल्लीतील हा भाग हरितपट्टा आहे. पर्यावरणाचे, नागरी नियोजनाचे, ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जपणारे सर्व नियम धाब्यावर बसवून हा महाल बनत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना नरेंद्र कांबळे, महिला नेत्या प्रतीक्षा हाडके, प्रभाकर धवणे, समीर बोरकर, भैय्या देशकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाकरिता संजय भगत, पांडुरंग राऊत, अनिल भोंगाडे, नरेश होटे, विनोद अवथळे, प्रकाश भगत, रामराव वाघमारे, अर्चना घुगरे, विजय जंगले, अर्चना गेटमे, मोहन मेश्राम, शेखर आडे, संतोष पाटील, रामदास घुगरे, रामभाऊ ठावरी, अनिल खंडाळकर, अंकुश ईखार, किरण बोटफोले, मयुरी ढोकणे आदिंची उपस्थिती होती. प्रचंड घोषणांत कार्यक्रमाची सांगता झाली. आंदोलनाचे संचालन प्रतीक्षा हाडके यांनी केले तर अर्चना घुगरे यांनी आभार मानले.