हिंगणघाट : मिल कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी उपविभागीय कार्यालयासमोर डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
मिल कामगारांच्या विविध मागण्यांसाठी १४ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले होते. मात्र, कुठलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे पुन्हा ५ जुलै रोजी निवेदन देण्यात आले. तरीही कुठलाच तोडगा न निघाल्याने मिल कामगारांनी हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.
शासनाने तडजोड करून मिल पूर्ववत सुरू करावी, कामगारांचे थकीत वेतन द्यावे, किंवा शासनाने मिल स्वतः चालवून कामगाराचे संपूर्ण देणे आहे हे त्वरित करावे, यावर कायमस्वरूपी तोडगा आठ दिवसांत न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी मनीष कांबळे, दिलीप कहूरके, जीवन उर्कुडे, चारू आटे, प्रणव पाटील, अविनाश नवरखेले, जितेंद्र शोजवाल, श्याम इडपवार, अरुण काळे, रत्नाकर कुभारे, विलास ढोबळे, सचिन खाडरे, नितीन कानकाटे, पोषक लाडे, सुभाष महादेव, दुर्गादास मानकर, योगेश जंगले, बबन बेळखडे, कवडू कळबे, मारोती कोहपरे, किशोर कडवे, राजेश खानकुरे, शरद मुळे, शंकर नगराळे, भारत भगत, रंजितसिंग ठाकूर, विनोद ठाकरे, प्रवीण झाडे, हेमंत छोळके, मनोहर काळे, बालाजी घुसे, विश्वाल थुल, नूतन राठोड आदींसह कामगार उपस्थित होते.