वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या विशेष रेल्वेगाड्याच सुरू असून, विना आरक्षण रेल्वेगाडीत बसता येत नसल्याने प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे रेल्वे विभागाने याची दखल घेत पॅसेंजर रेल्वे तत्काळ सुरू करण्याची मागणी आता प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.
सध्या कोरोनाचे थैमान आता काही प्रमाणात नियंत्रणात आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व काही अनलॉक झाले आहे. मात्र, रेल्वे सेवा अजूनही पूर्ववत सुरू झालेली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. कोरोना काळात केवळ विशेष रेल्वेगाड्या सुरू असल्याने जिल्ह्यातील कमी अंतरावर नोकरीनिमित्त तसेच इतर कामानिमित्त जाण्यासाठी आरक्षण तिकीट काढावी लागत असल्याने पूर्वी ३४ कि. मी अंतरावर जाण्यासाठी ४० रुपये मोजावे लागत होते.
मात्र, आता या भाड्यात दहा ते २० रुपयांपर्यंत वाढ झाल्याने सर्वसामान्यांना जास्त पैसे देताना आर्थिक झळ बसत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने आरक्षणाची अट रद्द करून रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर पकडू लागली आहे. रेल्वे विभागाने याकडे लक्ष देत प्रवाशांच्या मागणीचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
१५ टक्के तिकीट जास्त
कोरोाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट ९० रुपयांवरून ३० रुपये केली होती. इतकेच नव्हे तर पॅसेंजर रेल्वेगाड्या बंद करून केवळ आरक्षण तिकीट असले- ल्यांनाच रेल्वेतून प्रवास अनिवार्य केला. त्यामुळे कमी अंतरावरील गावाला जाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. पूर्वीच्या तिकिटांपेक्षा १० ते १५ टक्के तिकिटीची रक्कम जास्त आहे.