वर्धा : विद्युत देयकाची थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अभियंत्यास हनुमाननगर येथील तिवारी कुटुंबाने जबर मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी स्थानिक हनुमाननगर येथे घडली असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणचे अभियंता सचिन उईके व त्यांचे सहकारी शुक्रवारी थकबाकी वसुली मोहीम राबवीत होते. बी.बी. तिवारी, अंकित फुलचंद तिवारी, तसेच फुलचंद रामसमूज तिवारी यांच्या नावाने अनुक्रमे ७ हजार ९५०, ९ हजार ८०, २५ हजार ६० रुपये विद्युत देयकाची थकबाकी असल्याने त्यांना विद्युत् देयक तातडीने भरण्यास सांगण्यात आले; परंतु तिवारी कुटुंबातील सदस्यांनी विद्युत देयकाच्या कारणावरून वाद घालून अभियंता सचिन उईके यांना मारहाण केली.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अभियंता उईके यांनी तक्रार नोंदविली असून, तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात पंकज फुलचंद तिवारी, मनमोहन तिवारी, रघुनंदन तिवारी व एक अनोळखी इसम यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५३, ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहेत.