

वर्धा : कोरोना संसर्गामुळे मागील १४ महिन्यांपासून स्कूल व्हॅन बंद असून जागीच उभ्या आहेत. चरितार्थासाठी गाडीमालक-चालक अन्य कामे करीत आहेत. शाळा सुरू झाल्यास स्कूल व्हॅनचा गाडा पूर्वपदावर येणार आहे. मालक-चालकांना शाळा-महाविद्यालये सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
मागील वर्षभरापासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यंदाही हे संकट कायम आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाबाधित आणि मृत्यूसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले. शासनाने कॉन्व्हेंट-शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले. यामुळे स्कूल व्हॅन चालक-मालकांवर संकट ओढवले. चांगले शिक्षण घेत पदवी मिळवून अनेकांनी बँका, खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन स्कूल व्हॅन खरेदी करीत व्यवसाय सुरू केला.
जिल्ह्यात एकूण ५११ स्कूल व्हॅन चालक आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या व्यवसायावर गदा आली. स्कूल व्हॅन बंद ठेवाव्या लागल्याने चालक, मालकांपुढे उदरनिर्वाहाचे संकट उभे ठाकले. बँकेचे कर्ज कसे फेडायचे, घर खर्च कसा भागवायचा, असे अनेक प्रश्न मालकांपुढे उभे ठाकले.
वर्ष लोटूनही गाडा पूर्वपदावर येत नसल्याने अनेक चालक मालकांनी उपजीविकेसाठी इलेक्ट्रीशियन, गवंडी काम स्वीकारले आहे. या कामातून होणाऱ्या मिळकतीतून ते कुटुंबाचा गाडा हाकत आहे. दुसरीकडे वर्षभरापासून अधिक काळापेक्षा गाड्या जागेवरच उभ्या असल्याने नुकसान होत आहे. गाड्यांचा व्यावसायिक करही भरावा लगत आहे.
तीन हजारांवर विद्यार्थी या स्कूल व्हॅनमधून प्रवास करतात. कोरोनामुळेबंद असल्याने स्कूल व्हॅन चालक-मालकांवर संकट ओढवले आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रासाठी काम करीत असलेल्या स्कूल व्हॅन चालक-मालकांचा शासनाने विचार करावा, शाळा, कॉन्व्हेंट सुरू करावी, म्हणजे आमचा व्यवसायही सुरळीत होईल, अशी मागणी स्कूल व्हॅन चालक-मालकांतून होत आहे. शासनाच्या निर्णयाकडे चालक, मालकांचे लक्ष लागले आहे.