नागपुर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावलं आहे. यावेळी त्यांचे सुपुत्र ऋषीकेश देशमुख यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. ईडीनं अनिल देशमुख यांना सोमवारी ५ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहगे. याशिवाय अनिल देशमुख यांचे सुपुत्र ऋषीकेश देशमुख यांनादेखील समन्स बजावण्यात आलं असून त्यांनाही ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. यापूर्वी अनिल देशमुख यांनी दोन वेळा चौकशीसाठी प्रकृती आणि कोरोनाच्या कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्याचं म्हटलं होतं. तसंच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याची विनंती केली होती.
अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावलं असून त्यांना ५ जुलै रोजी ईडीच्या
कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे अनिल देशमुख यांचे सुपुत्र ऋषीकेश देशमुख यांना देखील ६ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल देशमुखांच्या घरी छापे मारले होते. यानंतर ईडीने त्यांना तीन समन्स पाठविले होते. यासाठी गेल्या मंगळवारी त्यांना सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली. तसेच वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत मंगळवारी अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. अनिल देशमुख यांच्या वकीलांनी ईडीकडे ८ दिवसांची मुदत मागितली आहे.