सेलू : दुचाकीने शेतात जात असताना रस्त्यावर लोंबकळणाऱया विजेच्या तारा अंगावर पडून गळ्यात अडकल्याने ज्ञानेश्वर चांदनखेडे (६५) व पत्नी हे दोघेही गंभीर जखमी झाले. शनिवारी कोलगाव शिवारात ही घटना घडली. यातील एकावर सेवाग्राम तर दुसऱ्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.
शेतकरी ज्ञानेश्वर चांदनखेडे हे नेहमीप्रमाणे शनिवारी ११ वाजताच्या सुमारास घोराड-कोलगाव रोडने आपल्या शेतात दुचाकीने जात होते. दरम्यान, रस्त्यावर अनेक दिवसांपासून लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा एकाएकी त्यांच्या वाहनावर पडल्या. त्या तारा त्यांच्या गळ्यात अडकून ते समोर जाऊन पडले. यात त्यांचा गळा कापला जाऊन गंभीर जखमी झाले, त्यांची पत्नीही सोबत गाडीवर होती. त्याही जखमी झाल्या. दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत सेवाग्राम रुणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ज्ञानेश्वर चांदनखेडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे.