देवळी : शहरासह लगतच्या परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीटाने चांगलेच झोडपून काढले. वादळामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूकही प्रभावित झाली होती. अचानक आलेल्या या धुव्वाधार पावसाने चांगलीच दाणदाण झाली.
देवळी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील झुणका भाकर केंद्रावरील एक हजार चौरस फुटाचे टिनाचे छत उडुन रस्त्यावर पडले. तसेच दोन मोठी झाडे रस्त्यावर कोसळले. तसेच विद्युम मंडळाचे डीपी स्ट्रक्चर व विद्युत तारा वर्धा रस्त्यावर कोसळूलन या मार्गावर वाहतूक काही वेळेकरिता खोळंबली होती.
रस्त्यावर पडलेल्या या तारांचा अंदाज न आल्याने एका दुचाकीचालकाचा अपघात झाला. वर्धा रस्त्यालगत असलेल्या शंकर सुरकार यांच्या बैलाच्या दावणीवर झाड पडल्याने एक गाय जखमी झाली. सोबतच देवळीची 33 के.व्ही.ची यंत्रणा कोलमडली.
औद्योगिक वसाहतीतील फिडर एकमध्ये व्हिल्स इंडिया समोरील झाडे तसेच विद्युत कंडक्टर तुटून त्याचा तारा पडल्या. शहरातील सुरजमळ डीपी टाऊनच्या दोन नंबरच्या फिडरवर झाडे पडल्याने कंडक्टर तुटून तारा पडल्या आहे. यासोबतच अनेक ठिकाणी वादळामुळे झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची माहिती तालुका प्रशासन घेत आहे.