वर्धा : पुलगाव नजीकच्या गुंजखेडा वाळू घाटातून अवैधरीत्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करीत चालकास ताब्यात घेत वाळूसह एकूण चार लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवार्ड स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सोरटा गावाजवळ नाकाबंदी केली असता एम.एच. 3२ एच. ५०२ क्रमांकाचा ट्रॅक्टर येताना दिसला. चालकास थांबवून पाहणी केली असता ट्रॅक्टर व ट्रॉलीत वाळू दिसून आली. पोलिसांनी दामोधर विठ्ठल कसार, रा. सोरटा यास अटक करीत वाळूसह ट्रॅक्टर जप्त केला, तर शंकर खंडागळे, रा. पुलगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाळूघाट बंद असतानाही चोरट्या मार्गाने होणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे शासनाचा कोटी रुपयांचा महसूल बुडत चालला आहे. असे असतानाही महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, पोलिसांनी आता वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे सुरु केले आहे.