आष्टी : आष्टी वनविभागा अंतर्गत येत असलेल्या आष्टी बोटामधील थार मार्गावर आडनाला जंगल परिसरात चार मोर मृत्युमुखी अवस्थेत आढळून आले. या मोरांचा मृत्यू कशाने झाला या संदर्भात अद्याप वनविभागाकडे कुठलीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे.
आष्टी ते सारवाडी थार मार्गे जाणाऱ्या मार्गावर आष्टी ते थारच्या मध्यभागात आडनाला जंगल आहे. या जंगलात वन विभागामार्फत प्राणी व पक्षांना पाणी पिण्याकरिता पाणवठे तयार केले आहे, त्या पानवठयाजवळ चार मोर मृतावस्थेत आढळून आले. वनविभागाच्या चमूने पंचनामा करीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांबळे यांच्या मदतीने उत्तरीय तपासणी केली असून काही नमुने तपासणीकरिता नागपूर येथे पाठवण्यात आल्याचे सांगितले.
राऊंड ऑफिसर देशमुख यांना मोराच्या मृत्यूच्या संबंधित विचारणा केली असता काल रात्री एक वाजेपर्यंत आम्ही गस्तीवर होतो. तोपर्यंत आम्हाला परिसरात काहीही आढळून आले नाही. सकाळी त्या परिसरात चार मोर मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली असे सांगण्यात आले. मोरांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही.
पाण्यात विष कालविल्याचा संशय
वनविभागाच्या वतीने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्या जवळच हे मोर मृतावस्थेत आढळून आले. यामुळे काही शिकाऱ्यांनी पाणवठ्याच्या पाण्यात विष कालविल्याचा संशय बळावत आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.